मूल नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून, येत्या २ डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसने एक दमदार आणि लोकप्रिय चेहरा मैदानात उतरवला आहे. माजी सभापती प्रशांत समर्थ यांच्या सहचारिणी एकता प्रशांत समर्थ या काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकता समर्थ या शिक्षित, ऊर्जावान आणि सामाजिक भान असलेल्या महिला असून, त्यांना समर्थ कुटुंबाच्या जनाधाराचा मोठा फायदा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
माजी सभापती प्रशांत समर्थ यांनी नगरसेवक म्हणून सुरू केलेल्या कार्यकाळात शहरात अनेक विकासात्मक कामे करून चांगली छाप पाडली. त्यांनी सामाजिक उपक्रम, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कार्याचा ठसा शहरात सर्वत्र दिसतो, आणि त्यामुळेच त्यांच्या सहचारिणींच्या उमेदवारीला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेसचे ऊर्जावान नेते संतोष रावत यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे.
एकता समर्थ या महिलांच्या सबलीकरणावर, रोजगारनिर्मितीवर आणि मूल शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणारे नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. “शहर स्वच्छ, सुंदर आणि रोजगारक्षम बनविणे” हे त्यांचे ध्येय असून, युवा वर्ग आणि महिलांमध्ये त्यांचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडणुकीत काँग्रेसच्या एकता प्रशांत समर्थ या शहराच्या राजकारणात नवी दिशा देणाऱ्या नेतृत्वाच्या रूपात उदयास येत असून, आगामी निवडणूक रंगतदार बनण्याची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे.
