नगराध्यक्षपदासाठी चुरस! भाजपा मध्ये उमेदवारांची लांबच लांब रांग – मूल नगर परिषद निवडणुकीत रंगणार ‘दे दणका’!




✍️ रवि वाळके / दे दणका न्यूज, मूल

मूल – राजकीय दृष्ट्या नेहमीच गाजणाऱ्या आणि संवेदनशील ठरणाऱ्या मूल नगर परिषदेची निवडणूक यंदा अक्षरशः रंगणार आहे. नगराध्यक्षपद मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाल्याने सर्व राजकीय पक्षांमध्ये ‘राजकीय तापमान’ वाढले असून, भाजपमध्ये तर उमेदवारीसाठी प्रचंड चढाओढ सुरू आहे.

🔸 भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी रांग

सत्तारूढ भाजपमध्ये महिलांची मोठी फळी मैदानात उतरायला सज्ज आहे. माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर,उषाताई शेंडे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मनिषा गांडलेवार, माजी सभापती महेंद्र करकाडे यांच्या पत्नी माधुरी करकाडे, माजी सभापती विद्या बोबाटे, माजी नगरसेविका रेखाताई येरणे, माजी शहराध्यक्ष प्रा. अर्चना युवराज चावरे, शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांची पत्नी चेतना मोहुर्ले, प्रा. किरण कापगते, इंजि. शिवानी आगडे, ॲड. जयश्री ठाकरे, तसेच मनिषा लाडवे या सर्वांनी इच्छुकतेची तयारी दाखविली आहे.
यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात उमेदवारीसाठी अक्षरशः ‘मोठी रांग’ लागली असून पक्षश्रेष्ठींचे डोके खाजवले जात आहे!

🔸 काँग्रेसकडूनही महिलांचा मोर्चा तयार

काँग्रेस पक्षही मागे नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांच्या पत्नी सोनाली रत्नावार, शहराध्यक्ष सुनिल शेरकी यांच्या पत्नी श्वेता शेरकी, तालुकाध्यक्ष गुरुदास गुरनुले यांच्या पत्नी माधुरी गुरनुले, तसेच महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष रागिनी आडपवार यांनी नगराध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली आहे.

🔸 इतर पक्षांचाही मोर्चा

माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी पत्नी एकता समर्थ यांना भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर शिवसेना (शिंदे गट, उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व शरद पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांनीही आपापले उमेदवार देण्याची तयारी दर्शविली आहे.

🔸 नगरसेवक पदासाठीही उत्सुकांची गर्दी

मूल नगर परिषदेत यंदा १० प्रभागांत २० नगरसेवक असणार आहेत. मागील निवडणुकीपेक्षा तीन नगरसेवकांची वाढ होणार आहे. त्यात ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्याने सभागृहात महिलांची मजबूत उपस्थिती दिसणार आहे.

🔸 निवडणुकीचा विलंब आणि उत्सुकता

मागील निवडणूक सन २०१६ मध्ये झाली होती. नियमानुसार २०२१ मध्ये पुढील निवडणूक व्हायला हवी होती, परंतु तब्बल चार वर्षांनंतर आता निवडणूक होत असल्याने शहरात उत्सुकता आणि चर्चा वाढल्या आहेत.

🔸 पक्षश्रेष्ठींच्या शिफारशीवर उमेदवार निश्चित

सर्व पक्षांचे स्थानिक नेते "पक्षश्रेष्ठी ज्या उमेदवाराला तिकीट देतील त्यांच्यासाठी काम करू" असे सांगत असले तरी, शिफारशीशिवाय उमेदवारी कठीण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

 एकंदरीत, नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदासाठी उमेदवारांची चुरस पाहता मूलमध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. येत्या काही दिवसांत पक्षांतर्गत हालचाली वेगाने सुरू होऊन ‘दे दणका’ वातावरण रंगणार यात शंका नाही! 


-