नगर परिषद निवडणूक 2025 : प्रभाग 6 मध्ये काँग्रेसचे विवेक मुत्यलवार यांचा प्रचार जोरात

 मतदारांचा प्रतिसाद उत्साहवर्धक!


रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

मूल नगरपरिषद निवडणूक 2025 च्या रणधुमाळीत प्रभाग क्र. 6 मध्ये काँग्रेसचे उमेदवार विवेक बळवंतराव मुत्यलवार भक्कम पावले टाकताना दिसत आहेत. प्रचाराचा वेग दिवसेंदिवस वाढत असून परिसरातील मतदारांचा वाढता प्रतिसाद काँग्रेसच्या ‘बदल’ मोहिमेला नवी धार देत आहे.

विवेक मुत्यलवार यांनी गेली अनेक वर्षे साई मित्र परिवार या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबवले. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत त्यांनी शहरात एक विश्वासार्ह अशी ओळख निर्माण केली आहे. शिर्डी येथे सपत्नीक सेवा करण्याच्या त्यांच्या कार्याला देखील स्थानिक पातळीवर मानाचा मुजरा मिळतो. या सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांचे व्यापक संपर्कजाळे अधिक भक्कम झाले असून तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच थरातून त्यांना मिळणारा पाठिंबा प्रकर्षाने जाणवत आहे.

शेतकरी विकास व सहकार क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा ग्रामीण मतदारांवरही विशेष उमटला आहे. मागील निवडणुकीत अत्यल्प मतांनी त्यांचा पराभव झाला होता. तेच भाजपचे प्रतिस्पर्धी पुन्हा रिंगणात असल्याने यावेळी ‘बदल होणारच’ अशी भावना मतदारांमध्ये निर्माण होत आहे. त्या पराभवाचेच सहानुभूतीत रूपांतर होत असल्याचे स्पष्ट संकेत स्थानिक निरीक्षक देत आहेत. याच प्रभागात सर्वसाधारण महिला गटातून सौ.
नलिनी दिनेश आडपवार यांच्या सक्रिय साथीनं प्रचाराला आणखी गती मिळाली असून घरगुती भेटी, गल्ली सभांमध्ये आणि युवा संवाद कार्यक्रमांत विवेक मुत्यलवार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

प्रभाग क्र. 6 मध्ये वातावरण अत्यंत रंगतदार बनले असून, स्वच्छ प्रभाग – सक्षम प्रतिनिधी या घोषवाक्याला मतदार उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराकडे वाढणारा कल पाहता या वेळी प्रभाग 6 मध्ये बदल घडणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

स्थानिक निरीक्षकांचे म्हणणे आहे की,
“मतदारांचा कल स्पष्ट आहे… या वेळी प्रभाग 6 मध्ये बदलाची चाहूल ठळकपणे जाणवत आहे!”