युवा नेतृत्वामुळे प्रभागात चर्चांना उधाण
नगर परिषद मूलची 2 डिसेंबरला होणारी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून दमदार युवा चेहरा म्हणून अतुल रवि गोवर्धन मैदानात उतरले आहेत.
सामाजिक बांधिलकी, लोकसेवा आणि सातत्याने जनतेच्या अडचणींना प्रतिसाद देणारे म्हणून अतुल गोवर्धन यांची ओळख प्रभागात ठळक आहे. गरीब, दिनदुबळ्यांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे, रुग्णांना मदत असो वा शैक्षणिक सुविधा—ते नेहमी लोकांसाठी उपलब्ध राहत असल्याने त्यांच्याबद्दल चांगला विश्वास निर्माण झाला आहे.
प्रभाग 8 मधील सर्वांगीण विकासाच्या मागणीला प्रतिसाद देत “नागरिकांच्या आग्रहास्तव मी रिंगणात उतरत आहे,” असे सांगत गोवर्धन यांनी विकासाचा रोडमॅप जनतेसमोर ठेवला आहे. खराब रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. “शहर विकासासाठी आपला हात आमच्या हातात द्या, बदलाचे वादळ आणण्याचे काम आम्ही करू,” असा विश्वासही ते नागरिकांना देत आहेत.
