मारोडा राजोली जिल्हा परिषद क्षेत्रात उमेदवारीसाठी रस्सीखेच!




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या मारोडा राजोली जिल्हा परिषद  क्षेत्र नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटासाठी आरक्षीत  झाला आहे. यामुळे या क्षेत्रातुन अनेक मातब्बर राजकीय नेते निवडणुक लढण्यास इच्छुक असुन आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण निवडणुकीच्या कामाला लागलेले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या क्षेत्रात उमेदवारीवरून चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ पूर्ण होवुन जवळजवळ साडेतिन ते चार वर्षाचा कालावधी पुर्ण होत आहे. प्रशासकाच्या माध्यमातुन जिल्हा परिषदेचा कारभार सुरू असल्याने सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासनाच्या कारभारात पदाधिकाऱ्यांचा धाक असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या चार वर्षात प्रशासनात एकाधिकारशाही निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीचे बिगुल केव्हा वाजेल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसुचित जाती महिलासाठी आरक्षीत आहे, निवडणुक आयोगाने जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाचे आरक्षण जाहिर केलेले आहे.
 मूल तालुक्यातील मारोडा राजोली जिल्हा परिषद क्षेत्र नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटासाठी आरक्षीत आहे, या क्षेत्रातुन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा या क्षेत्राचे सतत दोनदा नेतृत्व केलेल्या संध्याताई गुरनुले, भाजपाचे माजी मूल शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन वलकेवार , उश्राळा ग्राम पंचायतचे माजी सरपंच बंडु नर्मलवार हे भाजपाकडुन जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

भाजपाच्या माजी तालुकाध्यक्ष संध्याताई गुरनुले या मूल तालुक्यातील तिन गटापैकी कुठुनही निवडणुक लढु शकत असल्याने त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे त्यांना 
 जुनसुर्ला बेंबाळ गटातुन निवडणुक लढण्यास पक्ष श्रेष्ठी आग्रह करू शकतात. असे झाल्यास  प्रभाकर भोयर, गजानन वालकेवार व बंडु नर्मलवार यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच होण्याची दाट शक्यता आहे. तीनही उमेदवार सक्षम असल्याने पक्ष श्रेष्ठीकडे कुणाचे पारडे जड होते हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.


 कॉग्रेसकडुन याच क्षेत्रासाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप कारमवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ऐन वेळी दुसरे पुन्हा नाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  राजोली पंचायत समिती गण हे अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षीत आहे तर मारोडा पंचायत समिती गण हे नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षीत आहे. त्यामुळे पंचायत समितीचे आरक्षण बघत दोन्ही पक्ष उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या काही दिवसात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.