कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी विषयतज्ञ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २३/०९/२०२५ रोज मंगळवारला करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके मॅडम, प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. गणेश चव्हाण,संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा,नागपूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.गणेश गायकवाड,प्रा.घुमडे,प्रा.उपरे हे मंचावर उपस्थित होते.
प्रा.डॉ.गणेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचे महत्व अधोरेखित करतांना म्हणाले की ,मराठी ही केवळ मातृभाषा नसून ती आपली सांस्कृतिक ओळख आहे. मराठी शिकणे म्हणजे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता जीवनमूल्ये, संवेदना आणि साहित्याचा गाभा समजून घेणे होय. आजच्या स्पर्धेच्या युगात मराठी साहित्य विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देते आणि स्पर्धा परीक्षां मध्येही ती महत्त्वाची ठरते.ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मराठीचा अभ्यास केवळ गुणांसाठी न करता तिच्या अभ्यासातून व्यक्तिमत्व घडविण्यासाठी करावा असे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या डॉ.अनिता वाळके म्हणाल्या की, कर्मवीर महाविद्यालय सदैव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. मराठीसारख्या विषयावर अशा प्रकारचे मार्गदर्शन होणे ही काळाची गरज आहे. आपल्या मातृभाषेतून विचार मांडण्याची ताकद निर्माण झाली, तर विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो ,तसेच विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उपयोग स्वतःच्या शैक्षणिक व वैचारिक प्रगतीसाठी करावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी विभागचे प्रा.भूषण वैद्य यांनी केले, प्रास्ताविक कु.तेजस्विनी तांदळे या विद्यार्थ्यांनीने केले तर आभारप्रदर्शन प्रा. देशमुख यांनी केले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयाविषयी नवी उत्सुकता निर्माण होऊन त्यांना शैक्षणिक तसेच वैचारिक दिशा लाभावी या हेतूने विषय तज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
