पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आठवड्यापूर्वी शेतकरी
दुखावला असताना मागील दोन दिवसापासून आलेल्या समाधानकारक पावसाने मूल तालुक्यातील शेतकरी आनंदला असल्याचे दिसून येत आहे. समाधानकारक पावसाने खोडंबलेल्या रोवणी सुरू झाल्या असून अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाले असुन शेतकरी आनंदला असल्याचे दिसत आहे.
चंद्रपूर जिल्हा धान उत्पादन जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी मूल तालुका धान उत्पादन करण्यात अग्रस्थानी आहे . धानाची मोठी बाजारपेठ मूल शहरात असुन मूल वरून तांदळाची मुंबई, पुणे या शहरासह अनेक राज्यात तांदूळ निर्यात केला जातो. मूल तालुक्यात सर्वाधिक राईसमिल असल्याने तांदळासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेतकरी धान उत्पादक करण्यात पुढाकार घेत असतात.
तालुक्याचा विचार केल्यास जमिनीचे क्षेत्र ४६३९४.९८ हेक्टर असून लागवडीचे क्षेत्र २६,२८८.१४ हेक्टर आहे. तालुक्यात धानाची लागवड २४,१०० हेक्टर मध्ये केली जाते. शेतीसाठी लागलेला खर्च व उत्पादन खर्च यांची गोळाबेरीज केली तर शेतकऱ्याच्या हातात नगण्य स्वरूपात हातात रक्कम येत असते. वर्षभर केलेल्या मेहनतीचा खर्च बघता हातात जर काही मिळत नसेल तर शेती करण्यात फायदा नाही असा सूर शेतकऱ्याकडून
ऐकायला मिळत आहे. त्यामुळे या वर्षात मजुरांची वाढलेली मजुरी बघता अनेक शेतकऱ्यानी धानाच्या आवत्या टाकणं पसंत केले आहे . या वर्षात ६१५९ हेक्टर शेतावर आवत्याची पेरणी केली आहे. पूर्वी पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने रोवणीचे प्रमाण कमी होते मात्र दोन दिवसात ते वाढल्याने रोवणीला सुरवात झाली आहे. शेतीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी आवत्याची पेरणी शेतकरी मोठ्या प्रमाणात करतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पावसाअभावी खोडंबलेल्या रोवणीला वेग आला असुन ६० टक्के पेक्षा अधिक मूल तालुक्यात रोवणी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही दिवसात पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची सर्व रोवणी आटोपतील असा अंदाज असल्याने सर्वत्र शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
