भारतात पाण्याची मुबलकता असल्याने पाण्याचे महत्व वाटत नसले तरी भविष्यात योग्य नियोजन केले नाही तर फार मोठे संकट निर्माण होऊ शकते. यासाठी शाळा मधील विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी त्या पुढे सरसावत असल्याचे दिसून येत आहेत.भविष्यात जल, जीवन व पर्यावरण हे महत्वाचे विषय राहणार असून आतापासूनच विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील मंडळींना जागृत केले तर देशातील प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम होऊ शकतो हे आवर्जून सांगायला त्या पुढे सरसावल्या आहेत.
संस्कारक्षम करण्यासाठी आई वडिलांनी केलेल्या प्रयत्नामुळे आपण घडलो. त्यांनी दिलेल्या संस्काराचा फायदा समाजातील विद्यार्थ्यांना व्हावा. या उदात्त हेतूने मेघा जागंडा यांनी शोभा वसंत फाउंडेशन च्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करीत असल्याचे दिसून येत आहे. त्या म्हणतात की, मूल शहरात मी फेरफटका मारल्यानंतर असे आढळले की, सर्व रस्ते व नाल्या सिमेंटने बांधुन सर्व मार्ग बंद केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याला वावच नाही. अमेरिकेत मात्र रस्ते व नाली यांच्या मध्ये काही भाग सोडला जातो. त्यामुळे पाण्याचा निचराh व्हायला मदत होते. त्यामुळे पाणी जमिनीत मुरते व पाण्याची पातळी कायम राहण्यास मदत होत असते. आपल्या भागाकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे मात्र त्याचा उपयोग काटकसरीने करणे आवश्यक आहे. भांडे, कपडे व इतर कामासाठी अनावश्यक पाणी वाया घालविले जाते. ते टाळण्याची गरज आहे. आपल्या आई वडिलांना पाण्याचे महत्त्व सांगुन प्रत्येक लहान लहान गोष्टीतून पाणी बचतीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करावा. जल है तो जीवन है या उक्तीप्रमाणे पाण्याचे महत्त्व समजुन घेणे आवश्यक आहे.प्रत्येकांनी झाडे लावुन त्यांचे संगोपन करण्याची गरज आहे. तेव्हाच पर्यावरण आबाधित राहील. झाडांची कत्तल झाली तर पर्यावरणाचा ऱ्हास होईल. भविष्यात ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम जाणवायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखत सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचे स्रोत कायम राखण्याचा प्रयत्न करणे सर्वांची जबाबदारी आहे. त्याच बरोबर पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असणे आवश्यक असल्याचा सल्ला मेघा जागंडा देत आहेत.
