नलेश्वर पर्यटन स्थळाची झाली दुरावस्था, वनविभागाचे दुर्लक्ष


माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष देण्याची गरज 


रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 
 चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या नलेश्वर पर्यटन स्थळाच्या विकासासाठी लाखो रुपयांची निधी देण्यात आला. मात्र नियोजन करून निधी खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे आजच्या घडीला पर्यटन स्थळाची दुरावस्था झाली आहे. याकडे शासनाने लक्ष घालुन दुरावस्था दूर करण्याची मागणी जनतेनी केली आहे.
    मूल तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नलेश्वर याचे नाव घेतले. गायमुख म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी लाखो रुपयांची निधी दिला. राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्याकडे पाहिले जात होते. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले. यात बांधलेला स्टेज फुटक्या अवस्थेत झाला आहे. गाय मुख जवळ घाण पाणी जमा झाले आहे. झाडांची दुरावस्था झाली असून परिसरातील केलेल्या विविध विकास कामांचा बोजवारा वाजला असल्याचे दिसून येत आहे. मूल तालुक्यातील एक चांगले पर्यटन स्थळ वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे ओसाड झाल्याचे दिसत आहे. याकडे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष घालून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरावे व नलेश्वर गायमुख पर्यटन स्थळाचा चेहरा मोहरा बदलवावा अशी मागणी जनतेनी केली आहे.