जनकल्याण सामाजिक संस्था मूल च्या वतीने रुग्णांना फळे वाटप !


महाराष्ट्र दिनानिमित्य संस्थेचा उपक्रम 



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 


सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जनकल्याण सामाजिक संस्था मूल च्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्य रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय मूल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र लाडे यांच्या नेतृत्वाखाली मूल चे वैद्यकीय अधिकारी डॉ. परिक्षीत परचाके, डॉ. आदित्य कामडे व जनकल्याण सामाजिक संस्था मूलचे अध्यक्ष राजू गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सदस्य अमोल दुधे यांनी जनकल्याण सामाजिक संस्था मूल ही गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवून मूल तालुक्यात आपला सामाजिक ठसा उमटवला आहे. यापुढे समाज हिताचे विविध उपक्रम सर्वांच्या सहकार्याने राबवून मूल तालुकाच नव्हे जिल्हात देखील आपले नाव उचलण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष राजू गेडाम यांनी जनकल्याण सामाजिक संस्था मूल च्या वतीने वर्षभरात समाजहिताचे नवनवीन उपक्रम राबवून समाजातील विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे सांगितले. या वेळी  जनकल्याण सामाजिक संस्थेचे सदस्य आशिष आकनुरवार, अमोल दुधे, गुरूदास थेरकर, रवि वाळके, बंडू अल्लीवर, प्रशांत मेश्राम यांनी मनोगत व्यक्त करीत आपल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी कलीम शेख, पूजा पांडे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन बंडू अल्लीवर तर उपस्थितांचे आभार गुरुदास थेरकर यांनी मानले. पुढील कार्यक्रम वृद्धाश्रमाला परिवारासह भेट देऊन वृद्ध व्यक्तींशी संवाद साधणार असल्याचे संस्थेच्या वतीने ठरविण्यात आले.