वनविभागात चालले तरी काय?जनतेचा सवाल
चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्रात मूल शहराजवळील महाबीज केंद्राजवळील कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन२०१९ ला ३o हेक्टर जागेत ३३ हजार झाडे लावण्यात आली. ५ वर्षात लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र पाहिजे त्या प्रमाणात झाडे जगू शकली नाहीत. मात्र उर्वरीत असलेल्या झाडांना आग लागल्याने सर्वच झाडे आगीत भस्मसात झाली आहेत. धुलीवंदनाच्या दिवशी सामाजिक वनीकरण मूल च्या वतीने लावलेल्या आगीत झाडे भस्मसात झाली होती. तीच घटना ताजी असताना पुन्हा महाबीज जवळील वनीकरणाला
आग लावल्याने सर्वच झाडे आगीत भस्मसात झाली आहेत.
वनविभाग करोडो रुपये खर्च करून केलेल्या लावलेल्या झाडांना आग लावली जाते मात्र वनविभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे सोंग करीत असल्याचे दिसून येते. यावरुन अप्रत्यक्षपणे वनविभागाचाच हात तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चौकशी करावी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी जनतेनी केली आहे.
वृक्षांचे संवर्धन झाले तर वन्य प्राण्यांचे अधिवास सुरक्षित होते. यासाठी वनविभाग वृक्ष संवर्धन करण्यासाठी दरवर्षी लाखो वृक्षांचे वृक्षारोपण केले जाते. ज्या जोशात वृक्षारोपण केले जाते त्याच तत्परतेने कर्मचाऱ्यावर जबाबदारी देवुन लावलेल्या सगळ्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी बाध्य करणे आवश्यक आहे. माञ असला प्रकार होत नसल्याने वृक्ष संवर्धन होत नसल्याची ओरड सुरू आहे.वन्यप्राण्यांचे अधिवास सुरक्षित राहावे हा हेतू ठेवून तत्कालीन वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांच्या कार्यकाळात चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्रात
मूल शहरानजीक असलेल्या कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन २०१९ ला ३० हेक्टर जागेत ३३ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रत्येक झाडामागे तीन बाय तिन अंतर ठेवण्यात आले. यावेळी खड्डा खोदण्या पासुन तर झाड लावण्यापर्यत लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र वेळोवेळी वृक्ष संवर्धनावर लाखो रूपये खर्च केले. मात्र पाहिजे त्या प्रमाणात झाडे जगू शकली नाही. दोन वर्षानंतर राजूरकर यांची बदली झाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणुन प्रियंका वेलमे रुजू झाल्या. त्यांनी देखील तीन वर्षात या वृक्ष रोपणावर लाखो रुपयांचा खर्च करीत असल्याचे कागदपत्री दाखविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र मोजकीच झाडे जगू शकली. ती झाडे व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने काही दिवसापूर्वी लावलेल्या आगीत उरलेली सर्वच झाडे जळून भस्मसात झाली आहेत. वनविभागाचे कर्मचारी वेळोवेळी लक्ष घालुन देखरेख करीत असताना मात्र आग कशी लागते? असा प्रश्न जनतेनी उपस्थित केला आहे. यात अप्रत्यक्षपणे वनविभागाचाच हात तर नाही ना? असा टोला जनतेनी लगावला आहे. धुलीवंदनाच्या दिवशी सामाजिक वनीकरणाच्या झाडांना आग लावल्यानंतर पुन्हा महाबीज जवळील वनीकरणाला पुन्हा आग लावली आहे. त्यात अनेक वनसंपदा नष्ट झाली आहे.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जनतेनी केली आहे.
