आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला निर्देश*
पावसाळ्याच्या तोंडावर शहरवासीयांना होणारा त्रास टाळण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी तातडीने विशेष पावले उचलण्याचे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री व आमदार आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. चंद्रपूर महानगरपालिका तसेच बल्लारपूर, मूल नगर परिषद व पोंभुर्णा नगर पंचायत प्रशासनाला त्यांनी यासंदर्भात पत्राद्वारे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
साधारणतः ७ जूनपासुन मृग नक्षत्राला सुरवात होत असते. पावसाळ्यादरम्यान पाणी तुंबुन शहरातील नाल्यांमधील घाण रस्त्यावर येत असल्याचे आपण सातत्याने बघतो. हे टाळण्याच्या दृष्टीने पावसाचे पाणी तुंबून विपरित परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शहरातील नाले सफाई, कचरा सफाई तसेच पावसाळयापुर्वीची सर्वसाधारण कामे करण्याच्या दृष्टीने एक विशेष अभियान राबविण्याची आवश्यकता आहे, असे आ. श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
*सफाईचा अहवाल नागरिकांपर्यंत पोहोचवा*
ज्या-ज्या नाल्याची सफाई करण्यात आली आहे. त्याची माहिती नागरिकांना व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आहे. शक्य असल्यास त्याची छायाचित्रे देखील पाठवावीत. नागरिकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामावर विश्वास बसण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, याकडेही आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.
जनजागृती करतानाच संपूर्ण कामांची माहिती वर्तमानपत्रे व इतर माध्यमांवर प्रसिद्ध करावी, अशा सूचना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना पत्राद्वारे केल्या आहेत. स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर हीच खरी सेवा,अशा शब्दांत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सजग राहण्याचे आवाहन केले आहे.
