तालुका विधी सेवा समिती, मूल, शिक्षण प्रसारक मंडळ, मूल आणि कर्मवीर महाविद्यालय, मूल यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध कायदे, त्यांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आणि कायद्याच्या अनुषंगाने असलेल्या जबाबदाऱ्या याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अनिलजी वैरागडे (अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, मूल व ज्येष्ठ अधिवक्ता, तालुका बार असोसिएशन, मूल) होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून मा. न्यायाधीश सुमितजी जोशी (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, चंद्रपूर तसेच सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर) यांनी विध्यार्थ्यांना पोस्को कायदा, त्याचे परिणाम आणि समाजावर होणारा प्रभाव यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. न्यायाधीश पंकजजी अहिर (दिवाणी व फौजदारी न्यायाधीश, मूल तसेच अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, मूल) यांनी बालकामगार कायदा तसेच सायबर गुन्ह्यांविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या योग्य वापराबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आणि सायबर सुरक्षेबाबत माहिती दिली. तसेच मा. न्यायाधीश समीरजी कमलाकर (सहायक दिवाणी व फौजदारी न्यायाधीश, मूल व अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, पोंभुर्णा) यांनी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील कायदेविषयक महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या.कार्यक्रमास अॅड. प्रणवजी वैरागडे (उपाध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, मूल), अॅड. स्नेहल भडके (सचिव, तालुका बार असोसिएशन, मूल), अॅड. प्रीतम नागापुरे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके मॅडम आणि पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर हेही उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन करणे किती आवश्यक आहे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात यावर भर दिला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अॅड. अनिलजी वैरागडे यांनी विद्यार्थ्यांनी कायद्याबद्दल सखोल ज्ञान घेण्याची आवश्यकता असून, न्यायव्यवस्थेतील संधींबाबत माहिती ठेवली पाहिजे असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर मासिरकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
