कृषी महाविद्यालय, मूल आयोजित *अठ्ठावीसावी* शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २९ एप्रिल, २०२५ रोजी ग्राम चिचाळा ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. या प्रसंगी *चिचाळा* येथील ग्राम सदस्य श्री. सौराज ईटकलवार, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने *“कृषी- पूरक व्यवसाय आणि माती परीक्षण”* या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांनी शेतकऱ्यांनी शेती व्यावसायिक बनावे, शेती हा व्यवसाय समजून शेती करावी याकरिता शेतीसोबतच विविध कृषी संलग्न व्यवसाय करणे महत्वाचे आहे, जसे गांडूळखत निर्मिती, मशरूम उत्पादन, भाजीपाला पिकाचे मूल्यवर्धन, मत्स्यपालन ईत्यादी तंत्रज्ञान महाविद्यालयामार्फत कृषी संलग्न व्यवसायाची सुरुवात करावयाची झाल्यास शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल व शेतकऱ्यांनी विद्यापीठ निर्मित कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आव्हान याप्रसंगी केले. *मृद विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र* विभाग विषयतज्ञ *डॉ. अक्षय इंगोले* यांनी माती परीक्षणासाठी लागणारे मातीचे नमुने शेतामधून कसे घ्यावे, माती परीक्षण कुठे केल्या जाते आणि त्याचे फायदे काय आहेत याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. उन्हाळ्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे व माती परीक्षण अहवालानुसार खताची मात्रा द्याव्यात असे सुचविले. *कृषिविद्या* विषयतज्ञ सहाय्यक प्राध्यापिका *मोहिनी पुनसे* यांनी शेतकऱ्यांनी गांडूळखत प्रकल्प कसा सुरु करावा व त्याचे फायदे तसेच सदर प्रकल्प महाविद्यालयात सुरु आहे याबाबत माहिती दिली, सेंद्रिय पदार्थाचे जमिनीच्या सुपीकतेसाठी असणारे महत्त्व सुद्धा याप्रसंगी शेतकऱ्यांना त्यांनी पटवून दिले. *उद्यानविद्या* विषयतज्ञ *डॉ. अश्विनी गायधनी* यांनी फळ व भाजीपाला पिकांना योग्य बाजारभाव नसल्यास, भाजीपाला पिकांचे मुल्यवर्धित उत्पादने कसे तयार करावे जेणेकरून चांगला नफा शेतकऱ्यांना मिळवता येईल आणि शेतीपूरक व्यवसाय करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शेवगा लागवड तंत्रज्ञान व शेवग्याचे मानवी आरोग्यासाठी असणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. *रोगशास्त्र* विभाग विषयतज्ञ डॉ. *गितांशु डिंकवार* , यांनी कमीत कमी खर्चात धानाचे पेंढा (तणीस) वापरून विविध प्रकरची मशरूम उत्पादन कशा प्रकारे घ्यावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आणि मशरूमचे दैनंदिन जीवनात मानवी आरोग्यासाठी असणारे फायदे स्पष्ट केले. त्यांनतर सहाय्यक प्राध्यापक *कृषिविद्या* विषयतज्ञ *देवानंद कुसुंबे* , यांनी महाराष्ट्र शासनाच्या शेततळे या योजनेचा फायदा घेऊन शेततळे बांधता येईल व त्यावर मत्स्यपालन हा शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी *चिचाळा* गावाचे ग्रामपंचायत सदस्य *श्री. सौराज ईटकलवार* यांना कृषी महाविद्यालय मुल निर्मित गांडूळखत भेटस्वरुपात देण्यात आले.
सदर कार्यक्रमास एकुण *१६ शेतकरी* व *६ शास्त्रज्ञ* उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांचे आभार *कृषी वि शिक्षण* विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका *मनीषा लवणकर* यांनी मानले .
