रस्त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे.
जंगलव्याप्त गाव म्हणुन फुलझरी या गावाचे नाव घेतले जाते.जनाळा गावापासून ५ किमी अंतरावर असलेल्या हे गाव चारही बाजूनी जंगलाने घेरले आहे.घराशेजारी वाघ, बिबट्या, अस्वल अशा हिंस्र पशूंचा वावर असल्याने जीव मुठीत धरून संसाराचा गाडा सुरु आहे. चंद्रपूर असो वा मूल येथे पोहचण्यासाठी जंगलातून ५ किमी अंतर ओलांडत यावे लागते. मात्र सदर रस्त्याची दुरावस्था असल्याने १० मिनिटात पोहोचणाऱ्या रस्त्याला चक्क ३० मिनिटे लागत आहेत. एकादी घटना घडल्यास
रात्रीच्या वेळेस वैद्यकीय सेवा घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने रस्त्याची दुरावस्था हटवून सुव्यवस्थित रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
जंगलव्याप्त असलेले फुलझरी गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येत आहे. या गावातील जनतेचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेती बरोबरच गावातील तरुण रोजगारासाठी मूल व चंद्रपूर शहरात जात असतात. सायंकाळी कामावरून परत येताना मात्र रस्ता व्यवस्थित नसल्याने मोठी कसरत करावी लागते. यातच या रस्त्यावर वन्य प्राण्यांची वर्दळ असल्याने मार्ग काढण्यास बराच वेळ लागतो.
त्यामुळे जनतेत प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त होताना दिसत आहे. रस्ता कच्चा त्यातच जागोजागी गिट्टी पडली असल्याने मार्ग काढताना दुचाकीत कसल्याच प्रकारे बिघाड होणार नाही याकडे लक्ष देत वन्यप्राणी देखील घातक ठरणार नाही याकडे लक्ष द्यावे लागते.
त्यामुळे भीतीयुक्त वातावरणात वावरावे लागत असल्याचे जनता आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. वन्य प्राण्यांचा हल्ला असो की सर्प दंश असो त्वरित रुग्णालयात पोहचणे आवश्यक आहे. तसेच या गावात मोबाईलचे कव्हरेज नसल्याने कुणाशी संपर्क करणे कठीण आहे. यातच रस्त्याची दुरावस्था बघता लवकर पोहचणे कठीण झाले आहे. गर्भवती महिलेला न्यायचे असल्यास या रस्त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. अशा जंगलव्याप्त गावात रस्त्याची सोय असणे आवश्यक असताना मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. महिना भरापासून पाच किमी पैकी दीड किमीचा रस्ता तयार करण्यासाठी गिट्टी कंत्राटदाराने टाकली आहे मात्र रस्ता करण्यास सुरुवात केली नसल्याने अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. जंगल सदृश गावात त्वरीत रस्ता करून जनतेला मार्गाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी फुलझरी ग्राथस्थानी केली आहे.
मनोज जांभुळे सामाजिक कार्यकर्ते जानाळा:-
वन्यप्राण्यांचा संचार असणारे गाव म्हणुन फुलझरी गावाचे नाव घेतले जाते. या गावावरून तालुक्यात जात असताना रस्ता सुव्यवस्थित नाही. त्यामुळे रस्ता पार करण्यासाठी जीव मुठीत घेऊन मार्ग काढला जात आहे.या मार्गावर वन्यप्राण्यांची भीती असल्याने रस्ता चांगला करणे आवश्यक आहे.
