चंद्रपुरात पोलिसावर हल्ला; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी



रवि वाळके/दे दणका न्यूज 

चंद्रपूरमध्ये पोलिसांवर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला करून एका पोलिसाचा खून करण्यात आला, तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ही घटना ७ मार्च रोजी चंद्रपूरमधील पठाणपुरा गेटजवळील पिंक पॅराडाईज बारमध्ये घडली. बारमध्ये दोन पोलीस कर्मचारी बसले असताना काही तरुणांसोबत त्यांचा वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि संतापलेल्या एका तरुणाने काही साथीदारांच्या मदतीने चाकूने पोलिसांवर सपासप वार केले. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर समीर चाफले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरील प्राथमिक माहितीनुसार, बारमध्ये पोलिसांसोबत झालेल्या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात पोलिस तपास करीत आहेत.