अधिकारी व कर्मचाऱ्यांचे झाले दुर्लक्ष!दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याची मागणी
सामाजिक वनीकरण विभाग मूलच्या वतीने लाखो रुपये खर्च करून दोन वर्षापूर्वी रेल्वे स्थानक जवळील लहान सोमनाथ मंदिराला लागून असलेल्या जागेत
विविध प्रजातीचे ७०० रोपांची लागवड करण्यात आली. देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले.सर्व झाडे व्यवस्थित होती.
मात्र धुलीवंदन दिनी कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने सगळी झाडे जळून खाक झाली असुन नेहमी दक्ष असणारे सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी काय करीत होते?
असा प्रश्न अनेकाना पडला असुन लाखो रुपयाला चुना लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जनतेनी केली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण मूल अंतर्गत मूल रेल्वे नजिक असलेल्या लहान सोमनाथ जवळील वनविभागाच्या जागेत दोन वर्षापूर्वी विविध प्रजातीचे ७०० रोपांची लागवड करण्यात आली. परिसरात कुंपण, खड्डे व इतर कामासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मूल येथील सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांच्या देखरेखी खाली हे वृक्षारोपण करण्यात आले. असे असले तरी ते कार्यालयात असो की वृक्षारोपण करण्यात आलेल्या ठिकाणी असो ते त्याठिकाणी न जाता मोबाईल वरून काम करीत असल्याने कर्मचाऱ्यावर वचक राहिला नाही. लावलेल्या वनीकरणाबाबत जनतेला माहिती होण्याच्या दृष्टीने फलक लावणे बंधनकारक असताना मात्र कुणाला कळू नये यासाठी फलक लावणे मुद्दाम टाळण्यात आले आहे. लाखो रुपये खर्च करून केलेल्या वृक्षारोपणाकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. बिले मात्र नियमित काढण्याचा त्यांचा हातखंड असल्याची चर्चा सुरू आहे. केलेल्या वृक्षारोपण ठिकाणी कर्मचारी भेट देत असतील तर जाळणारे अज्ञात व्यक्ती कसे दिसले नाही? असा प्रश्न जनतेनी उपस्थित केला आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लावलेल्या वृक्षारोपणाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने
अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची चर्चा आहे. याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून झालेला खर्च वसुल करण्यात यावा अशी मागणी जनतेनी केली आहे.
