कोटी रुपयांचा बंधारा झाला बेकाम !
उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा राहत असलेल्या चिरोली येथील अंधारी नदीत या वर्षात मार्च महिन्यातच पाणी आटल्याने भीषण पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. गुरांसोबतच प्रेत जाळणे व अस्थी विसर्जनासाठी पाणी साठा उपलब्ध राहत असल्याने पाण्याची अडचण नसायची . या वर्षी मात्र शेतकऱ्यांनी दुबार पीक घेण्यासाठी नदीच्या पात्रात मोटार पंपानी पाणी घेतल्याने पाण्याचा साठा आटल्याची चर्चा आहे. तसेच पाण्याचा साठा कायम राहावा
यासाठी कोटी रुपये खर्च करून बांधलेला बंधारा बेकाम झाला आहे. शेतकऱ्यांनी पिकासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना देखील तसे न करता अंधारी नदीतील पाणी मोटार पंपने घेतल्याने पाण्याचे भीषण संकट उभे ठाकले आहे. या गंभीर प्रश्नाकडे तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
मूल तालुक्यातील अंधारी नदी नेहमी पाण्याने भरलेली असायची. या नदीजवळ स्मशानभूमी असल्याने मृतदेहाला जाळणे व अस्थी विसर्जन करणे आदी बाबी सुव्यवस्थित होत होत्या. याच बरोबर गुरांना पाणी पिण्यासाठी देखील सोयीचे होते. मात्र या वर्षात मुबलक प्रमाणात पाऊस आला. आलेला पाऊस अडून राहावे यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूलने कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधला. मात्र मुबलक प्रमाणात पाऊस आल्यावर देखील पाण्याचा साठा उपलब्ध नसल्याने भीषण संकट निर्माण झाले आहे.
तालुका प्रशासनाने उन्हाळ्याच्या दिवसात पाणी साठा उपलब्ध राहावा यासाठी तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज होती. तसेच दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना पाणी नेण्यास अटकाव करायला पाहिजे होते.मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे पाण्याचा साठा अत्यल्प प्रमाणात उरला आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. या वर्षात काही शेतकऱ्यांनी दुबार पीक घेण्यासाठी नदी पात्रात रेतीचा उपसा करून खड्डे तयार करण्यात आले आहेत.त्यातुन पाणी शेतीला पुरविला जात आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा साठा अत्यल्प प्रमाणात उरला आहे. मार्च महिन्यातच ही परीस्थिती आहे तर एप्रिल व मे महिन्यात अंधारी नदीच्या पात्राची अवस्था गंभीर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नेहमी अस्थी विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या नातेवाईकाला त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असुन नदी पात्रात पाण्याचा साठा राहण्याच्या दृष्टीने
तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
