मूल जनरल असोसिएशनचे अध्यक्ष मोती टहलियानी यांची मागणी
व्यापारी दृष्टिकोनातून सक्षम असलेल्या मूल तालुक्यात सुपर फास्ट रेल्वेचा थांबा नसल्याने लांब अंतरावर जाऊन माल खरेदीसाठी बल्लारपूर अथवा चंद्रपूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे पकडावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोरोना काळापूर्वी काही सुपर फास्ट रेल्वे मूल मारोडा रेल्वे स्टेशन येथे थांबा देण्यात आला होता. मात्र त्यांनतर संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातल्याने रेल्वे बंद करण्यात आल्या. तेव्हापासून सुपर फास्ट रेल्वेचा थांबा बंद तर बंदच आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाना लांब अंतरावरून प्रवास करणे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने मूल येथे सुपर फास्ट रेल्वेचा थांबा देण्याची मागणी मूल जनरल असोसिएशन चे अध्यक्ष मोती टहलियानी यांनी केली आहे.
रेल्वेचा प्रवास सुखकारक व आर्थिक दृष्ट्या परवडणारे असल्याने रेल्वेने प्रवास करण्यास सर्वच पसंती दर्शवितात. व्यापारी व शिक्षणाच्या दृष्टीने देखील सर्वांना सोईचे असल्याने सुपर फास्ट रेल्वेचा थांबा असणे गरजेचे झाले आहे. सध्या स्थितीत बल्लारपूर - गोंदिया मार्गासाठी केवळ एकच डेमो रेल्वे सुरू आहे. ती वेळ देखील सर्वांना सोईची नसल्याने जास्त रक्कम खर्च करुन खाजगी वाहनाने जावे लागत आहे. यात आर्थिक भुर्दंड तर सोसावा लागतो त्याच बरोबर वेळ देखील खर्ची घालण्यात येत आहे.मूल तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून यातील तांदूळ मुंबई, पुणे व इतर राज्यात देखील पाठविला जातो. त्यामुळे व्यापारी वर्गाना फास्ट रेल्वेचा थांबा असल्यास ये जा करण्यास सोईचे होऊ शकते. मूल मार्गे जाणाऱ्या सुपर फास्ट यशवंतपूर एक्स्प्रेस, चांदा फोर्ट जबलपूर एक्सप्रेस, चैन्नई एक्सप्रेसचा थांबा दिल्यास व्यापारी तसेच शैक्षणिक दृष्टीने सोईचे होऊ शकते. या संदर्भात व्यापारी वर्गानी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पत्रव्यवहार सुरू करून सुपर फास्ट रेल्वेचा थांबा देण्याची मागणी मूल जनरल असोसिएशन मूल चे अध्यक्ष मोती टहलियानी यांनी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे.
