*तीन सख्ख्या बहिणींनी जीव गमावला;
रवि वाळके/दे दणका न्यूज
चंद्रपूर जिल्ह्यावर मात्र शोककळा पसरली आहे. दोन वेगवेगळ्या घटनेत तीन सख्ख्या बहिणींसह तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. आंघोळीसाठी नदी पात्रता उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने या घटना घडल्याची माहिती आहे. प्रशासनकडून सहा जणांचा शोध घेतला जात आहे.
*वैनगंगा नदीच्या पात्रात तीन बहिणी बुडाल्या*
गडचिरोली – चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड येथे वैनगंगा नदीच्या पात्रात चंद्रपुरातील कु. प्रतिमा प्रकाश मंडल (२३), कु. कविता प्रकाश मंडल (२१), कु. लिपिका प्रकाश मंडल (१८) या तीन बहिणी बुडल्याने खळबळ उडाली आहे. या तिन्ही बहिणींचा युध्दपातळीवर शोध घेतला जात आहे. एकूण पाच जण बुडाले होते. त्यापैकी दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे तर तिघींचा शोध सुरू आहे. सदर घटना ही दुपारच्या सुमाराची आहे.
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रहिवासी असलेले मंडल कुटूंबिय महाशिवरात्री निमित्त मार्कंडा येथे जाण्यासाठी निघाले होते.मात्र चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाखाली आंघोळीसाठी उतरले असता खोल पाण्यात गेल्याने कु.लिपिका मंडल, कु.प्रतिमा मंडल व कु.कविता मंडल या वैनगंगेच्या पाण्यात बुडाल्या.
या तिघींनी पाण्यात बुडत असतांना आरडा ओरड केली. तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी लोक धावले. मात्र खोल पाण्यात असल्याने त्यांना पाण्याच्या बाहेर काढता आले नाही. त्यांच्याच बाजूला असलेल्या दोघींना वैनगंगा नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र या तिन्ही बहिणी खोल पाण्यात गेल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही असे सांगण्यात येत आहे. या तिघींंचा युध्दपातळीवर शोध सुरू आहे. या तिघींचा शोध घेण्यासाठी या परिसरातील नावाड्यांना पाचारण करण्यात आले आहे तसेच पोलीसांना माहिती दिली आहे.मोटर बोट देखील मागविली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी अख्ये मंडल कुटूंब वैनगंगा नदीच्या काठावर होते. त्यांच्याच डोळ्यादेखील ही दुर्देवी घटना घडली.
*अंघोळीसाठी गेलेले तीन युवक नदीत बुडाले*
राजुरा (चंद्रपूर ) महाशिवरात्रीनिमित्त नदीवर अंघोळीसाठी गेलेले तीन युवक नदीच्या पात्रात बुडाल्याची घटना राजुरा तालुक्यात घडली आहे. या तिघांचाही सध्या शोध सुरू आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील हे युवक असून ते शेजारच्या लोकांसोबत जवळच्या वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. तुषार शालिक आत्राम (वय १७), मंगेश बंडू चणकापुरे ( वय २०), अनिकेत शंकर कोडापे (वय १८) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच्या काही लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. आता चंद्रपूर येथून बचाव पथक पाठवण्यात आले असून, शोध घेतला जात आहे.