२२ लाख रुपयाचा दंड ठोठावला तरीही रेती तस्कर रेती चोरण्यात सक्रिय !


*प्रशासनाचा धाकच उरलेला नाही*





रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
     
तलाठ्याशी असलेले मधुर सबंध जोपासत रेती तस्कर वाट्टेल तेवढी रेती चोर मार्गाने चोरण्याचा गोरखधंदा सुरू असल्याने रेती तस्कराची हिंमत दिवसेदिवस वाढतच चालली आहे. तालुका प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत रेती माफिया सक्रिय झाले आहेत. यात प्रशासनाने सक्रियता दाखवित १० महिन्यात २२ लाख रुपयांचा दंड ठोठावत वसुल केला. अवैध रेती चोरताना आपल्यावर कारवाई होऊ शकते हे माहित असताना देखील रेतीची तस्करी करण्यासाठी पुढे धजजावत असल्याने प्रशासनाचा धाकच उरला नसल्याचे दिसून येत आहे.
      मूल शहर व तालुक्यात शासकीय व खासगी कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रेतीची मागणी वाढली आहे. वाट्टेल ती किंमत देऊन रेती विकत घेण्याचा घाट घातला जात आहे. रेतीचा लिलाव न झाल्याने रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत आडमार्गाने रेती तस्कर सक्रिय झाले आहेत.या रेती तस्करावर पाळत ठेवण्यासाठी तहसीलदार मृदुला मोरे यांनी पथक निर्माण केले. या पथकांनी एप्रिल २०२४ पासून जानेवारी २०२५ पर्यंत २ हायवा व १६ ट्रॅक्टर असे एकूण १८ वाहनांना पकडले. यात २२ लाख १८ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावत तो वसूलही केला आहे. असे असले तरी रेती तस्कर अजूनही थांबलेले दिसत नाही. मूल तालुक्यातील सर्वच नदी घाटावर दिवसा रात्र रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या निवासापासून रेती तस्कर रेकी करीत असल्याने कोणती गाडी केव्हा व कुठे जात आहे याची सर्वच माहिती रेती तस्कराना मिळत असते. रेती माफियाचे नेटवर्क जबरदस्त असल्याने पथक येण्यापूर्वीच सर्वच गायब करून इथे काहीच घडले नाही असे चित्र रंगविले जाते. त्यामुळे रेती तस्करांच्या मुसक्या आवळणे कठीण होत आहे. कुठे मुद्दाम ढिलाई तर कुठे कळक धोरण असे माणूस पाहून देखील कारवाई केली जात असल्याने प्रशासनाच्या कारवाई बाबत साशंकता निर्माण केली जात आहे. रेती तस्करा वर कारवाई करतांना कुणी कितीही वजनदार व्यक्ती असली तरी कायद्याच्या चौकटीत त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. तेव्हाच प्रशासनाचा धाक राहिल, नाही तर येरे माझ्या मागल्या...! अशी स्थिती निर्माण होईल, यात शंकाच नाही.