अवैध दारूने काढले डोके वर , मूल तालुक्यासह शहरात वाढली व्यसनाधीनता !




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

तालुक्यातील चितेगाव येथील नकली दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने धाड मारून मोठ्या प्रमाणावर नकली दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त नकली दारूची विक्री तालुक्यात होत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शासनाने बंद असलेली दारू सुरु केली त्यावेळी अवैध दारु विक्री बंद होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र तो अंदाज खोटा ठरल्याचे दिसून येते. कारण मूल शहराबरोबरच तालुक्यात देखिल अवैध दारूने डोके वर काढले असुन मोठया प्रमाणात व्यसनाधीनता वाढली असल्याचे दिसुन येत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
       जिल्ह्यात दारूबंदी असल्याने अवैध मार्गाने दारूची विक्री करता येते हे साधुन काही दारू माफियानी नकली दारू तयार करण्याची शक्कल लढविली व तालुक्यातील चितेगाव जवळील मूल नागपुर महामार्गावरील एका महाविद्यालयात दारू निर्मिती करण्याचा कारखाना सुरू केला होता. यातील मास्टर माईंडचा छडा लावता आला नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल.नकली दारुसाठी वापरले जाणारे साहित्य हुबेहूब बनविण्यासाठी मास्टर प्लॅन बनविण्यात आला होता. नकली दारू त्यावेळी बेधडकपणे विक्री केली जात असल्याचे दिसुन आले होते. या नकली दारु मुळे कुणाची पत्नी, कुणाचा भाऊ तर कुणाचा बाप गमावण्याची पाळी आली होती. महामार्गावर असलेल्या या कारखान्याकडे पोलिसांना माहिती होऊ नये याबाबत चर्चा होती. नकली दारूचा जो कुणी मास्टर माईंड होता त्याने इतरत्र कुठेतरी नकली दारूचा अड्डा उभारला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. आजच्या स्थितीत अवैध दारूने डोके वर काढले आहे. मूल शहरापासून तर तालुक्यातील १११ गावात दारू विक्री जोमात सुरू आहे. मूल शहराचा विचार केला तर मजुर वर्ग असलेल्या वार्डा वॉर्डात नकली दारू मिळत असुन आरोग्यावर परिमाण होताना दिसत आहे. एकंदरीत व्यसनाधीनतेचे प्रमाण तालुक्यात सर्वत्र मोठ्या संख्येने असल्याचे दिसुन येते. या दारूमुळे कमी वयात अनेक महीला विधवा होत असल्याची चर्चा आहे. हिच स्थिती ग्रामीण भागातील मजूर करणाऱ्या कुटुबाची आहे. सध्याच्या काळात पाहिजे तिथे दारू दुकान, बार व बियर शॉपी मिळत आहे.जनतेच्या कल्याणासाठी सामाजिक बांधिलकी जपणारे नेते हरपत असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रीचे वाढणारे प्रस्त थांबविणे गरजेचे झाले आहे. नकली दारू व अवैध दारू विक्रीवर आळा व प्रबोधन केल्या शिवाय समाजातील गरीब व मजुर वर्गाचे कल्याण अशक्य वाटते.