साहेब, जंगलात ठीक आहे मात्र शेतात देखिल वाघाचे हल्ले वाढले, आम्ही करायचे काय ? शेतकऱ्यांचा सवाल


रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 
जंगलात गेल्यास वन्य प्राणी मानवाचा फडशा पाडतो हे ठीक आहे मात्र नेहमी वावर असलेल्या शेत शिवारात वाघाचे हल्ले वाढले असुन आम्ही शेती करायची की नाही? शेती नाही केली तर कुंटुबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ? असे विविध प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत असल्याचे वास्तव्य चित्र दिसत आहे. शेतीचा हंगाम असल्याने शेती पाहण्यासाठी शेतात जावेच लागते माञ आज शेत शिवार देखिल सुरक्षित नसल्याचे कालच्या घटनेवरून दिसुन येते. यावरून जंगल ठीक आहे, शेतात देखिल वाघाचे हल्ले वाढल्याने करायचे काय? असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे.
     जंगलाचे रक्षण होत असल्याने वन्य प्राण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वनक्षेत्र तेवढेच असल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीत आगेकूच करतांना दिसत आहेत. त्यामुळे मानव प्राणी संघर्ष वाढायला लागला आहे. मूल तालुक्यात बफ्फर व नॉन बफ्फर अशी दोन वनविभागाची परिक्षेत्र असुन दोन्ही ठिकाणी वन्यप्राण्यांचे अधिवास मोठया प्रमाणात असल्याचे दिसुन येते. या दोन वर्षांत दोन्ही परिक्षेत्रात जवळपास ३० जणांचा बळी गेला आहे.त्यामुळे तालुक्यातील जंगल व्याप्त शेतात भितीयुक्त वातावरण आहेच माञ सध्या ज्यात नेहमी शेतकऱ्याची ये जा सुरू असते त्या शेतशिवारात वाघाचे हल्ले वाढल्याने भयभीतता असणे स्वाभाविकच आहे.वनविभागाने मानव प्राणी संघर्ष रोखण्यासाठी जंगलव्याप्त क्षेत्रात तारेचे कुंपण करण्याची योजना तयार करून काही ठिकाणी प्रत्यक्षात करण्यात आले मात्र ते देखिल यशस्वी झाले नसल्याचे दिसुन येत आहे.शेतकऱ्यांनी शेतात वन्यप्राणी शेतीचे नुकसान करू नये यासाठी सौरऊर्जेचे कुंपण लावण्यात आले होते. ते देखिल पाहिजे त्या प्रमाणात फायदेशीर ठरु शकले नसल्याची चर्चा शेतकरी वर्गात चर्चिल्या जात आहे. त्यामुळे वनविभाग व शेतकऱ्याने काय तोडगा काढावा यासाठी विचारमंथन होणे काळाची गरज आहे.दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने यावर उपाय योजनेचे नवे संकट वन विभागासमोर उभे ठाकले आहे. सतत वर्दळीच्या शेत शिवारात होणाऱ्या घटनेने शेतकरी पुर्णतः हादरला आहे. त्यामुळे शेती करण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.