आरोग्य विषयक समस्या
ग्रामीण भागातील जनतेला निर्माण होत असल्याने त्यांना गावातील परिसरात उपचार मिळावे यासाठी मूल तालुक्यातील राजोली
प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत निर्माण करण्यात आली. मात्र रिक्त पदे भरली नसल्याने रुग्णांचा योग्य उपचार होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. रिक्त पदांचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र आजही कायम आहे. त्यामुळे १५ गावांचा भार पेलवता पेलवत नसल्याने जनतेत नाराजीचा सुर उमटत आहे. यासाठी रिक्त पदे
तातडीने भरण्याची मागणी जनतेनी केली आहे.
ग्रामीण भागात जनतेला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने त्यांना लांब अंतरावर जाऊन उपचार करणे कठीण असते. यासाठी गावा जवळच उपचार करता यावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील राजोली अंतर्गत १५ गावे येत असुन यात राजोली, डोंगरगांव, चिखली, चीतेगाव, बेलघाटा, तसेच नवेगाव, लोन खैरी, मूरमाडी, ताडभूज व गोलभुज या जंगल व्याप्त गावांचा समावेश असुन
या गावातून रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात. त्यांना योग्य उपचार होण्याच्या दृष्टीने वैद्यकिय यंत्रणा सज्ज आहे . वैद्यकिय अधिकारी असेल तरी परिचारिका , शिपाई व औषधी संयोजक ही पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. औषधी संयोजक पद रिक्त असल्याने कुठली औषधी आणायची यांचे ताळमेळ नाही. त्यामुळे रुग्णांना आवश्यक असलेली
औषधी नसल्याचे दिसुन आले. परीचारिकेचे पद रिक्त असल्याने एकाच परीचारिकेवर भार पडत आहे. देखभाल व इतर कामासाठी शिपाई पद रिक्तच आहे. त्यामुळे त्याचाही भार एकूण वैद्यकिय प्रशासनावर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला योग्य उपचार करण्यासाठी रिक्त पदे भरणे आवश्यक झाले आहे. तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणुन राजोली गावाची ओळख असुन परिसरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र त्यांची वेळोवळी निराशा होताना दिसत आहे. याकडे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हा परिषद चंद्रपूरच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
