शौचालयात भरल्या गोवऱ्या व लाकडे!
रवि वाळके/दे दणका न्यूज
उघड्यावर शौचालयाला बसल्याने विविध आजारांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी शासनाने घरोघरी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हगणदारी मुक्त गाव करण्याचा संकल्प देखील करण्यात आला.घरोघरी शौचालय बांधकाम करण्यात आले माञ ग्रामीण जनतेची आजही मानसिकता बदलली नसल्याने आजही ग्रामीण भागात रस्त्यावर शौच्छास बसत असल्याचे दिसते. मात्र शौचालयात शेणाच्या गोवऱ्या व लाकडे भरून ठेवण्यात आलेल्या आहेत.यावरुन हगणदारीमुक्त गावाचे सप्न मूल तालुक्यात भंगल्याचे जाणवत आहे.
मानवी जीवनात शौच्छविधी आवश्यक बाब असुन आरोग्याच्या दृष्टीने शौचालयात घरी बसण्याची सवय लागावी. विशेषतः महीलांना उठाबशी होऊ नये यासाठी ग्रामीण भागात शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी विशेष अभियान राबवुन संपुर्ण गावे
हगणदारी मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. विविध आजारांचा शिरकाव उघड्यावर शौच्छास बसल्याने होत असते ही बाब लक्षात घेऊन सन २०१४ पासुन केंद्र शासनासोबतच राज्य शासनाने देखिल गंभीरपणे घेऊन घरोघरी शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. गावागावात शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावर करोडो रुपये खर्च करण्यात आले.
पंचायत समिती मूल मार्फतीने १०० टक्के शौचालय बांधण्याचा महत्वकांक्षी उपक्रम अंमलात आणला गेला. मूल तालुका हागणदारी मुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र आजही मूल तालुक्यातील अनेक गावात उघड्यावर शौचाश बसताना दिसत आहे. त्यामुळे नाकाला रुमाल लावुन मार्ग काढावा लागत आहे. हागणदारी मुक्त गावे झाल्याने अनेक पुरस्कार देण्यात आले. हगणदारी मुक्त गावाची संकल्पना ही लोकचळवळ होण्याची गरज होती. माञ पुरस्कारापुरती निर्माण झालेली चढाओढ फार काळ टिकू शकली नाही. संपूर्ण तालुका, जिल्हा हगणदारी मुक्त दाखवायचे असल्याने कागदावरच हगणदारी मुक्त गाव रेखाकींत करण्यात आले. गेल्या १० वर्षांपासुन सुरू असलेल्या या हगणदारी मुक्त गावाची संकल्पना आजही मूल तालुक्यात साकारली गेली नाही. जनतेनी अनुदान मिळते म्हणून शौचालयाचे बांधकाम केले मात्र त्यात शेणाच्या गोवऱ्या व लाकडे भरून ठेवण्यात येत असल्याचे दिसते. या शौचालयाचा
वापर काही मोजक्या गावातच केला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे हगणदारी मुक्त गावाचे सप्न भंगल्याचे दिसुन येत आहे. या गंभीर बाबीकडे पंचायत समिती मूलचे गटविकास अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
