मूल नगर परिषदेचे नविन शॉपिंग कॉमप्लेक्स बेवारस!

इमारतीची तोड फोड , वायरिंग व लावलेल्या वस्तूंची चोरी,

चौकीदार ठेवण्याची मागणी 



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

        बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी  नगर परिषद मूल  ला वैशिष्ठपुर्ण  कामासाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत मौजा मूल येथील सर्व्ह न.९०७ मधील जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या निर्मितीसाठी तत्कालीन पालकमंत्री तथा आमदार सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने १३ कोटी ७२ लाख २३ हजार ६१० रुपये मंजुर करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी  भव्य दिव्य इमारत तयार केली. रीतसर काही महिन्यापूर्वी उद्घाटन देखील थाटात पार पडले. माञ बेरोजगारांना रोजगारासाठी दुकान गाळे देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र किंमत अवाढव्य असल्याने कुणीही घेण्यास पुढाकार घेतला नाही.यामुळे ही इमारत बेवारस पडली नसल्याने नगर परिषदेच्या देखरेखी अभावी अज्ञात व्यक्तींनी इमारतीची तोडफोड करीत विद्युत वायरिंग व लावलेल्या अनेक वस्तू चोरण्यात आल्या आहेत. त्यामुळे शॉपिंग कॉम्प्लेक्स दुरुस्त करून बेरोजगारांना वाजवी किमतीत देण्याची मागणी करीत या इमारतीच्या देखभालीसाठी चौकीदार ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
        बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मूल येथिल मूल चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नगर परिषदेच्या जागेत भव्य दिव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले. या इमारतीचे रीतसर उद्घटन होऊन छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल असे नामकरण करण्यात आले. ही इमारत झाल्याने अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली. नगर परिषदेने दोनदा निविदा सूचना वर्तमान पत्रात देण्यात येवुन प्रक्रिया राबविली. माञ शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकान गळ्याचे भाडे व सुरक्षा रक्कम जास्त असल्याने कुणीही भाडे तत्वावर घेण्यास पुढाकार घेतला नाही.सर्वसाधारण बेरोजगार युवकांना परवडेल असे भाडे ठेवले असते तर अनेकांचा रोजगार सूरू झाला असता.  इमारत देखील सुव्यवस्थित तर राहिली असती. याच बरोबर मूल नगर परिषदेचा महसुल सुरू झाला असता. नगर परिषदेने आकारले भाडे वाजवी पेक्षा जास्त असल्याने कुणीही घेण्यास पुढाकार घेतला नसल्याने इमारत बेवारस पडली आहे. यातच जुन्या इमारती मागील काळात लिलाव झाल्या त्यात अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कमी किंमतीत गाळे घेवुन 
दहा पट भाडे आकारले जात आहे. यावरून राजकीय नेते टाळूवरचे लोणी खात असल्याचा प्रकार दिसत आहे. बेरोजगार युवक रोजगाराअभावी इतरत्र भटकताना दिसत आहेत. 
शॉपिंग कॉम्प्लेक्स ची किरकोळ दुरूस्ती करून वाजवी किंमतीत बेरोजगारांना उपलब्ध गाळे दिल्यास अनेक हाताना रोजगाराबरोबरच इमारतींची देखभाल देखील व्यवस्थित ठेवण्यास मदत होईल. याकडे नगर प्रशासनाने लक्ष घालुन गरजू बेरोजगार युवकांना गाळे देण्याची कारवाई करण्याची मागणी बेरोजगार युवकांनी केली आहे.