मूल तालुक्यातील रेती तस्कर सक्रिय
रवि वाळके/ दे दणका न्यूज मूल
महसूल विभागाचे क्रीडा सामने होत असल्याने रेती तस्कर सक्रीय झाले असून तहसीलदार व सर्व यंत्रणा क्रीडा सामन्यात व्यस्त असल्याची माहिती मिळताच रेती तस्कर सक्रिय झाले आहेत. या कालावधीत हजारो ब्रास रेती उपसा करून चोरण्याचा घाट रेती तस्कराचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महसूल प्रशासनाची भीती असताना देखिल दररोज भेजगाव नदी पात्रातून दररोज १० ते १५ ट्रॅक्टर रात्रीच्या वेळेत रेतीची तस्करी होत असल्याने लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी फेरल्या जात आहे. ३१ जानेवारी पासून क्रीडा सामने असल्याने सगळी यंत्रणा व्यस्त आहेत. ही नामी संधी रेती तस्करीना चालुन आली आहे. कुणीही रेती घाटावर जाणार नसल्याने कुणाचीही भीती उरली नाही.त्यामुळे रेती तस्कर बिनदिक्कतपणे रेतीवर डल्ला मारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर काय उपाय योजना केली जाते याकडे लक्ष लागले आहे.
मूल तालुक्यात शासकीय व खाजगी बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने रेतीची मागणी वाढली आहे. त्यामुळे भेजगाव नदी घाटाबरोबरच इतरही नदी घाटावर रेती तस्कर सक्रिय झाले आहेत. महसूल प्रशासन कुठल्या कामाला व्यस्त राहतात याकडे रेती तस्कराचे बारीक लक्ष असते. तहसीदार व नायब तहसीलदार यांच्या घरावर सतत रेकी केली जाते. रेती तस्कराची यंत्रणा एवढी सक्रिय आहे की,अधिकाऱ्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाला कुणाकडून माहिती मिळाली तरी त्या ठिकाणी काहीच गवसत नसल्याचे दिसुन येते.रात्रौ रेतीचे अवैध उत्खनन करून हजारो ब्रास रेती चोरून वाहतुक केली जात आहे. त्यामुळे शासनाच्या हजारो रुपयाच्या महसुलावर पाणी फेरल्या जात आहे. ट्रॅक्टर पकडल्यावर लाखो रुपयांच्या वर दंड ठोठावला जातो हे माहित असताना देखील रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे यावरून महसूल प्रशासनाची भीती देखील नसल्याची बाब प्रकर्षाने जाणवते. महसूल विभागाचे क्रीडा सामने असल्याने ही नामी संधी चालून आल्याने रेती तस्करीचा रात्रीचा खेळ सुरू राहिल. यात लाखो रुपयांच्या महसुलावर डल्ला मारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावरून रेती तस्कर क्रीडा सामन्यात व्यस्त तर रेती तस्कर चोरण्यात मस्त अशी स्थिती दिसत आहे.
