दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने एक ठार, एक जखमी, याच वळणार तीन महिन्यापूर्वी दोघे झाले होते ठार

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने एक ठार, एक जखमी,  
याच वळणार तीन महिन्यापूर्वी दोघे झाले होते ठार 

रवि वाळके/ दे दणका न्यूज मूल

  
तालुक्यातील चांदापूर फाट्याजवळील गोसीखुर्द नहराजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही नहरात पडल्याने एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवार (दि.२८ ) ला सकाळी ६ वाजता घडली. हेमंत परितोष गाईन (२२) रा. जयनगर ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली हा युवक ठार झाला असून मुकेश माकन बाला ( २२) रा.जयनगर ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली हा जखमी झाला आहे. अशीच घटना तीन महिन्यापूर्वी याच वळणावर घडली असून दुचाकीवर तिघे जात असताना तिघेही नहरात पडले होते. त्यावेळी नहराला पाणी असल्याने दोघेजण पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. पुन्हा हीच घटना घडल्याने धोकादायक वळण असल्याने अनेकांचे बळी जात असल्याचे दिसून येत आहे. यासाठी वळण मार्ग दुरुस्त करण्याची मागणी होताना दिसत आहे.
     चंद्रपूर वरून मूल मार्गाने चामोर्शी कडे सकाळी ६ वाजता मृतक हेमंत परितोष गाईन व जखमी 
  मुकेश माकन बाला हे दुचाकी क्रमांक एम एच ३३ ए.एच - ३६५५ ने जात असताना चांदापूर फाट्याजवळील गोसीखुर्द नहरात जवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही नहरात पडले. नहर खोल मात्र कोरडा असल्याने दोघांनाही जबर मार लागला. त्यात हेमंत जागीच ठार झाला तर मुकेश गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मागील २५ ऑक्टोबर २०२४ ला दुपारी १२ वाजता दरम्यान नामेश पुरुषोत्तम ढोबे (३१), गणपत हिरामण भोयर (२६) हे नहरात पाणी असल्याने वाहुन गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह मिळाले होते तर भूषण हिरामण भोयर (२८) हा युवक बचावला होता. तीन महिन्याच्या अंतराने ही दुसरी घटना घडली असून यात तिघांचा बळी गेला आहे. या महामार्गावरील वळण धोकादायक असल्याने यात उपाय योजना केली नाही तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.